आपल्या घरचे पाळीव प्राणी, आपल्या घरातील एक हिस्साच असतात. त्यांचे आपल्या घरात येणे, हळू हळू रमणे, त्यांच्या सवयी, त्यांच्या गमतीजमती सगळेकाही खुप मजेदार असते. या गोष्टी मध्ये तंगू एक मांजरीचे पिल्लू आहे. घरातील मुले तंगू भोवती कश्याप्रकारे रमतात याचे वर्णन, तसेच तंगुच्या विलक्षण बुद्धिमत्तेची ओळख सुद्धा या गोष्टीमध्ये केली आहे.
तंगू साधना निवास मध्ये कधी आला कोणालाच माहित नाही. तीन महिन्याआधी, पहाटे पहाटे तो मागच्या अंगणातील गाईच्या गोठ्या मध्ये ठेवलेल्या नारळाच्या पोत्यामागे दडून बसलेला आढळला. तो खूप घाबरलेला होता. त्याला बघून आजोबांनी सांगितले की, त्यांनी रात्री एका मांजराच्या भांडणाचा आवाज ऐकला होता. मोठया बोक्याने त्याच्यावर हल्ला केलेला दिसतो आहे आणि हा लहानसा पिल्लू आपला जीव वाचवण्यासाठी या पोत्यामागे येऊन लपला आहे. सगळी मुले आजोबांच्या बोवताल उभी राहून तंगू बद्दल आणि त्या भयानक मोठया बोक्या बद्दल विचार करीत होती. हे छोटेशे मांजरीचे पिल्लू, आता त्यांच्यासाठी एक सुपर-कॅट झाले होते, ज्यांनी अतिशय हिंमतीने शत्रूला तोंड दिले होते आणि स्वतःला वाचविले होते.
तंगू खूप घाबरलेला होता आणि बाहेर येत नव्हता. आजोबांनी एका प्लेट मध्ये दूध टाकले आणि ती प्लेट नारळाच्या पोत्याच्या जवळ ठेवली. सगळेजण आता मागच्या दारानी आतमध्ये गेले आणि दार बंद केले. मागच्या अंगणात उघडणाऱ्या खिडकीजवळ ते सर्व जमा झाले आणि शांतपणे गोठ्या मधल्या हालचालीवर नजर ठेऊन उभे होते. तंगू थोड्यावेळानी हळूहळू बाहेर आला आणि प्लेट मधले दूध प्यायला लागला. आधी तो दूध पितांना दचकत होता पण नंतर त्यांनी पूर्ण लक्ष देऊन दूध संपून टाकले. त्याच्या आईपासून दूर असलेला, उपाशी असलेला तंगू दूध पिल्यावर थोडा बरा दिसत होता. तानू नी तंगू ला हळूच येऊन कुरवाळले. तंगुच्या डोळ्यातील भीती कमी झाली होती. हळूहळू घरातील सर्व मुले तंगुचे मित्र बनले आणि तंगू सुद्धा त्याचे प्रेम त्यांना स्वतःचे शरीर त्यांच्या पायाला घासून दाखवत होती.
आठवड्याभरात मांजरीच्या छोट्या पिल्लाला त्याचे नाव मिळाले. तंगू आता बऱ्यापैकी दिसत होता. त्याचे पांढरे केस आता चमकदार दिसत होते. मुलांचा त्याच्याबद्दलचा लळा दिवसेंदिवस वाढतच होता. सकाळी उठल्यावर सर्वात पहिली गोष्ट मुलांना करायची होती ती म्हणजे तंगूला जाऊन बघणे. मुलांचा बराचसा वेळ आता गोठ्या मध्ये जात होता. गोठ्याचे नाव आता तंगुचे घर झाले होते. तंगू आता मुलांच्या सुखदुःखातील सोबतीच झाला होता. मुले त्याच्यासोबत नेहमी काहीतरी सांगत असायचे आणि तंगू सुद्धा निवांतपणे मुलांचे सर्व बोलणे लक्ष देऊन ऐकत होता.
सात वर्षाचा मोनू एकदा तंगूला सांगत होता, की त्याला गणित बिलकुलच समाजत नाही आहे आणि त्याला ते मुळीच करायचे नाही आहे. तानू एकदिवस जोरजोरात पाय आपटून तंगूला सांगत होता, की त्याच्या मोठया भावानी त्याला प्रॉमीज करून सुद्धा टाकिंग टॉम खेळण्यासाठी फोन दिला नाही. तंगू त्याच्या भोवती गोल गोल फिरून त्याचे सांत्वन करीत होता आणि झालेल्या अन्यायाचा विरोध करीत होता. दिवसभरात अश्या कितीतरी कंप्लेन तंगूकडे यायच्या. तंगू काही करू शकत नव्हता पण तंगुमध्ये त्यांना, त्यांना समजणारा एक जिवाभावाचा मित्र दिसत होता.
एकदोनदा मोठा बोका त्यांना घराच्या परिसरात दिसला. तंगूत्याला पाहताच खुपच घाबरून जायचा. तंगुच्या सुरक्षिततेची आता सर्वांना काळजी होती. एकदा आजोबा सकाळी उठून थक्क झाले. तंगू हॉल मधील सोफ्यावर निवांत झोपली होता. त्याच्या हिंमतीची आता सर्वानीच दाद दिली. स्वतःच्या बचावासाठी रस्ते कसे शोधायचे हे प्राण्यांना किती चांगल्याप्रकारे माहीत असते. आधी तंगू स्वतःचे जीव वाचवण्यासाठी एका मोठया शत्रूसोबत लढला, आणि आता तो स्वतःच्या अधिकारासाठी लढत आहे. सर्वांसाठी जेव्हा घर आहे, तेव्हा त्याला सुद्धा सुरक्षित घर हवे आहे आणि ते मिळविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला देखील. आपल्या अधिकारांसाठी कश्याप्रकारे पुढाकार घ्यायचा हे तंगूनी दाखवून दिले होते.
एकदा खुप कडाक्याची थंडी होती आणि पाऊस देखील पडत होता. सर्वेजण उबदार पांघरुणामध्ये होते आणि विचार करा तंगू कुठे असेल.? तंगू होता गोठ्यामधील चुलीजवळ असलेल्या गरम पानाच्या पिंपाजवळ. पुन्हा एकदा तंगूच्या बुद्धिमत्तेवर सगळेच चकित झाले. जीवनात हार मानायची नाही आणि नवीन रस्ते नेहमी शोधत राहायचे हा एक धडाच तो जणू सर्वांना देत होती.
留言