top of page
Writer's pictureJyoti Bhagat, India

संघर्ष .....जगण्याचा

रखरखत्या उन्हात रस्त्याच्या बाजुला काहीसा कर्कश असा ढोलकीचा आवाज येतो. आवाजामुळे लक्ष वेधले जाताच डोंबा-यांची ८ ते १० वर्षांची चिमुकली आपले कौशल्य दाखवताना दिसतात. क्रॉस (एक्स) केलेल्या दोन बांबूच्या टोकांवर बांधलेली १०-१२ फूट उंच दोरीवर ही चिमुकली बघता बघता बगिच्यात फिरावे तेवढ्या सहजपणे चालतात. त्यांची आई ढोलकी बडवते अन् बाप कॉमेंट्री करतो।

काही वेळेनंतर अनपेक्षीतपणे बाप बांबूजवळ जातो अन् दोरीला जोराने हलवितो. बघणारांच्या काळजाचा ठोका चुकतो. मात्र, सर्कशीतील कसलेल्या कलावंताला लाजवेल असे कसब दाखवत चिमुकली खाली उडी घेतात.

येथे रस्त्यावर सर्कस करणा-या डोंबा-याच्या खेळअचा पहिला अंक संपतो. लगेच बाप एका चिमुकल्याला उचलून घेतो. नंतर सुरू होतात ईकडून तिकडे, उलट्यातिलट्या माकडउड्या. नंतर छोट्याश्या जाडजूड लोखंडी रिंगमधून आपले संपूर्ण शरिर बाहेर काढण्याचे अचंबित करणारे कौशल्य दाखवितात. मोठी माणसं ढोपराने दगड फोडून दाखवितात. येथे खेळ संपतो.


माशांच्या पिल्यांना पोहण्याचे प्रशिक्षण घेण्याची गरज पडत नाही. असाच प्रकार डोंबा-याच्या मुलांच्या बाबतीत बघायला मिळतो. फिरस्ती जीवन जगणा-या या जीवांच्या शरिराला कधी मुसळधार पाऊस, कधी कडाक्याची थंडी तर कधी रखरखते उन्ह असे काही लवचिक बणवून सोडते की चांगल्या चांगल्या जिम्नॅशिअम (जिम्नॅस्टिक)नेही चाट पडावे. पोटाची खळगी भरण्यासाठी काटकुळ्या शरिरातील लकब दाखवित हे लहानगे आपल्या आईवडीलांसोबत ‘कमाओ और खावो’चा पाठ गिरविताना दिसतात. रस्त्यावर अनेक जण त्यांचे ते कौशल्य बघतात अन् टाळ्याही वाजवितात. ‘रस्ते का खेल फुकटमे‘ समजत अनेक जण तेथून तसेच सटकतात. काही जण पाच, दहा रुपये त्यांच्या कटोरीत टाकतात आणि आपले कर्तव्य पार पाडल्याचे समजत तेथून निघतात. डोंबारी अन् त्यांचे मुलही दुस-या स्थानाकडे कूच करतात.

मिळेल ते खाणे अन् जागा मिळाली तेथे आपला डेरा टाकणारी ही मंडळी. ते शाळेत जातात की नाही जात, शिकतात की नाही शिकत, हा प्रश्न त्या बिचा-या फिरस्ती जीवांच्या जगण्यासाठी महत्वाचा नसतो. दोन वेळेच्या जेवणासाठी त्यांचा संघर्ष सुरू असतो. त्यांना कुणी काय देतात, काय नाही, त्याबाबतही त्यांची कधी काही तक्रार नसते. निसर्गाने त्यांना जगण्यासाठी एक वेगळे कौशल्य दिलेले असते. या कौशल्याच्या आधारेच ते कसलीही कुरबूर न करता जीवनाचे रहाटगाडगे ओढताना दिसतात. दोन-चार हजारांसाठी कुणाचाही विश्वासघात करणा-या आणि पाच दहा हजारांच्या बदल्यात कुणाचाही जीव धोक्यात घालणा -यांसाठी या बिचा-या जीवांचे निरागस जगणे वास्तूपाठ ठरावा.

मुलाला सुरुवातीपासून दर्जेदार शिक्षण मिळावे असा जवळपास प्रत्येकच पालकाचा प्रयत्न असतो. त्यासाठी पालक मंडळी आवश्यक ते सर्व प्रयत्न करतात. शिक्षणासोबतच त्यांना विविध खेळात निपून करण्यासाठीही क्रीडा प्रबोधिनी, प्रशिक्षण केंद्र, शिबिरात घालतात. खेळांसाठी सरकार मोठमोठ्या क्रीडा प्रबोधिनी उघडते. खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी प्रशिक्षणाची अन् शिष्यवृत्तीचीही सोय करून देते. वर्षांनुवर्षे जिम्नॅस्टिकचे धडे घेणा-या देशी-विदेशी खेळाडूचे कसब बघून आम्ही टाळ्यांचा कडकडाट करतो. टाळळ्या वाजवितानाच त्या खेळाडूचे रबरासारखे लवचिक शरिर (जे अनेक वर्षांच्या तपस्येची कमाई असते.) आमच्या प्रशंसेचा विषय ठरते. दुसरीकडे अनेकदा पोटभर अन्न नशिबी नसलेली डोंबा-यांची मुलं कोणतेही प्रशिक्षण न घेता त्यांच्या नैसर्गिक रबरी शरिरातील कौशल्य दाखवतात. त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा करण्याची कुणी तसदी घेत नाही. जणू ते प्रशंसेसाठी बनलेच नाही. ‘यांना (डोंबा-यांच्या मुलांना) पोटभर अन्न अन् चांगले प्रशिक्षण मिळाले तर ते काय धमाल करतील, असा प्रश्न अनेकदा चमकून जातो.

या गरिब जीवाचे पालकत्व सरकार किंवा सामाजिक, स्वयंसेवी संस्था - संघटनांनी स्विकारले अन् त्यांना तज्ज्ञांकडून चांगला आहार आकार दिला तर ही मुलं देशाला पदकं मिळवून देतील, असेही वाटते. बरोबर नाही का?

6 views1 comment

Recent Posts

See All

1 Comment


Rujuta Deshmukh
Rujuta Deshmukh
Jun 08, 2021

The article is written on very important issue, which was always neglected. The author has given very relevant solutions for bringing child labour in the mainstream.

Like
bottom of page